अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट प्रशांत आर. बडगुजर यांच्यावर न्यायालयाबाहेर ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता भ्याड हल्ला करण्यात आला. हा हल्ला अमळनेर न्यायलयाच्या बाहेर करण्यात आला. या हल्ल्याचा निषेध करत अमळनेर वकील संघाच्या वतीने मारहाण करणाऱ्यांना अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.
याबाबत अधिक असे की, अमळनेर वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट प्रशांत आर. बडगुजर यांच्यावर न्यायालयाबाहेर विरोधी पक्षकार राजेंद्र पवार व त्यांची बहिण मिनाक्षी भामरे यांनी मंगळवारी ४ मार्च रोजी दुपारी ४ वाजता भ्याड कल्ला केला. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर अमळनेर वकील संघाने तातडीने बैठक घेत या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
वकील संघाने या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतात वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. न्यायव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असलेल्या वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी हा कायदा अत्यंत आवश्यक असल्याचे मत संघाने व्यक्त केले. या घटनेनंतर अमळनेर वकील संघाने तातडीची बैठक बोलावून ठराव संमत केला. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वकील संघाच्या वतीने देण्यात आला आहे. न्यायालय परिसरातच वकिलावर हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. यामुळे कोर्ट परिसरात अधिक पोलिस बंदोबस्त असावा, अशीही मागणी वकिलांकडून केली जात आहे.