नवी दिल्ली वृत्तसंस्था । भारतीयांची करोना विषाणूवरील लसीची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. येत्या ७३ दिवसांमध्ये ‘कोविशिल्ड’ नावाची कोविड-१९ आजारावरील भारताची पहिली लस विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
या लसीवर काम करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटने ही माहिती दिली आहे. केंद्र सरकार मोफत लसीकरण करणार आहे. या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. ही लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केली असून त्याची भारतातच निर्मिती केली जाणार आहे.
‘सिरम’चे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, “सरकारने ‘सिरम’ला लसीचा ‘विशेष उत्पादन प्राधान्य परवाना’ दिला आहे. चाचण्यांची प्रोटोकॉल प्रक्रिया ५८ दिवसांत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम करण्याचे सूचित केले होते. याद्वारे पहिला डोस २२ ऑगस्ट त्यानंतर दुसरा डोस २९ दिवसांनी तयार होईल. त्यानंतर पुढच्या १५ दिवसांत अंतिम चाचणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर आम्ही ‘कोविशिल्ड’ लस बाजारात आणण्याच्या विचारात आहोत.”
या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला भारतातील २० केंद्रांवर शनिवारपासून सुरुवात झाली. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात पुणे आणि मुंबईत तर गुजरातमधील अहमदाबाद येथे याची चाचणी होत आहे. १,६०० लोकांवर चाचणी होणार आहे. ही लस सिरम इन्स्टिट्यूटच्या मालकीची असून कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अॅस्ट्रा झेनिका लॅबशी याबाबत सर्वात आधी करार केला आहे.
या करारांतर्गत भारतासाठी या लसीचे हक्क आणि रॉयल्टी घेण्यात येणार आहे. भारतासह जगातील ९२ देशांमध्ये या लसीची विक्री केली जाणार आहे. दरम्यान, केंद्राने आधीच एसआयआयला सूचित केले आहे की, ते थेट या लसी घेतील आणि भारतीयांना मोफत लसीकरण करण्याचा विचार करीत आहेत. सरकारने यापूर्वी सिरमकडे पुढील वर्षी जूनपर्यंत १३० कोटी भारतीयांसाठी ६८ कोटी डोसची मागणी केली आहे.