नवी दिल्ली वृत्तसंस्था । काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. ‘किमान शासन, कमाल खासगीकरण’ ही मोदी सरकारची विचारसरणी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोविड तर एक निमित्त आहे, शासकीय कार्यालये ‘स्थायी कर्मचारी मुक्त’ बनवायचे आहेत. तरुणांचे भविष्य हिरावून घ्यायचे आहे, ‘मित्रांना’ पुढे न्यायचे आहे.” असं राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटसोबत एक बातमी देखील शेअर केलेली आहे. ज्यामध्ये करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सरकराने खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने नव्या पदभरतींवर स्थगिती आणली असून, रिक्त पदांची भरती केली जात नसल्याचे म्हटले आहे. .
या अगोदर राहुल गांधी यांनी, “१२ कोटी रोजगार गायब, ५ ट्रिलिअन अर्थव्यवस्था गायब, सामान्य नागरिकांचं उत्पन्न गायब, देशातील आनंदी वातावरण आणि सुरक्षा गायब, प्रश्न विचारला तर उत्तर गायब, विकास गायब आहे,” असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला होता.
काँग्रेसने अनावश्यक खर्चांमध्ये कपातीशी निगडीत सरकारच्या प्रस्तावावर शनिवारी भूमिका मांडली आहे. नव्या नोकऱ्यांच्या निर्मितीवर स्थगिती हे जनविरोधी पाऊल आहे आणि हा आदेश तात्काळ मागे घेतला गेला पाहिजे., असे काँग्रेसचे म्हणणे आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते राजीव शुक्ला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, या क्षणी देशाची आर्थिक परिस्थिती अतिशय खराब आहे. ४५ वर्षांमध्ये प्रथमच जीडीपीमध्ये एवढी घसरण झाली आहे. या भयानक आर्थिक संकटातून सावरण्यासाठी सरकारला एक पाऊल पुढे यायला हवं, जसे जगभरातील अन्य देश करत आहेत. खासगी क्षेत्रात तर कपात सुरू आहे. मात्र सरकारने आता आपल्या नोकऱ्यांवर देखील स्थिगिती आणली आहे. अशाप्रकारे या देशातील तरूण कुठे जाईल? कुठं नोकऱ्या मिळतील त्यांना? काय करतील ते? असे प्रश्न यावेळी शुक्ला यांनी उपस्थित केले.