Home क्राईम चुलत भावांना मारहाण अन् महिलेचा विनयभंग !

चुलत भावांना मारहाण अन् महिलेचा विनयभंग !


जळगाव लाईव्‍ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील सुदीप कॉम्प्लेक्स परिसरातील दुकानाचा ताबा घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन चुलत भावांना चौघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग करून तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडला आहे. या संदर्भात रात्री ११ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावात राहणारी ४५ वर्षीय महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे अमळनेर शहरात सुदीप कॉम्प्लेक्स परिसरात एक दुकान आहे. याच दुकानाच्या ताब्यावरून हा वाद निर्माण झाला. मंगळवारी २२ जुलै रोजी दुपारी २ वाजता, महिलेचा मुलगा आणि पुतण्या या दोघांना संशयित आरोपी दिलीप हरचंद जैन, पंकज दिलीप जैन, चांदणी पंकज जैन आणि रिषभ मुकेश शहा (सर्व रा. अमळनेर) या चौघांनी शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली.

मुलगा आणि पुतण्याला मारहाण होत असल्याचे पाहून महिलेने भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपींनी त्यांचे हात ओढून त्यांचा विनयभंग केला आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने तात्काळ अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. तिच्या तक्रारीनुसार, मारहाण आणि विनयभंग करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई हे करीत आहेत.


Protected Content

Play sound