दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी फसवणुकीचा मार्ग वापरल्याचा आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने गुरुवारी फेटाळून लावला. त्यामुळे पूजा खेडकर यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
बोगस प्रमाणपत्राबाबत यूपीएससीने कारवाई करत पूजा खेडकर यांचे आयएएस पद काढून घेतले असून तिला भविष्यात कोणत्याही परीक्षेला बसण्यास मनाई केली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप करत पूजा खेडकरवर दिल्लीमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये आपल्याला अटक होऊ नये यासाठी पूजा खेडकरने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो न्यायालयाने नाकारला आहे. दिल्ली पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवण्याची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यूपीएससीच्या काही अंतर्गत व्यक्तींनी तिला मदत केली आहे का, याचा शोध घेण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहे. बुधवारी संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्याची तात्पुरती उमेदवारी रद्द केली. यूपीएससीने घेतलेल्या कोणत्याही परीक्षेला बसण्यासही संस्थेने मनाई केली आहे.