
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कानळदा येथून भुसावळकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दांपत्य जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात शनिवार, १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता नशिराबाद गावाजवळ घडला. या प्रकरणी सोमवारी, २१ जुलै रोजी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कानळदा येथील रहिवासी असलेले किशोर सपकाळे हे आपली पत्नी माधुरी सपकाळे यांच्यासोबत १९ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता दुचाकी क्रमांक (MH 19 M 7563) ने भुसावळकडे जाण्यासाठी निघाले होते. नशिराबाद गावाजवळील यु.व्ही. लाईट हॉटेलसमोरून जात असताना, मागून भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच 02 ईआर 5382) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील किशोर सपकाळे आणि त्यांची पत्नी माधुरी सपकाळे हे दोघेही जखमी झाले. अपघातामुळे त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. अपघातानंतर चारचाकी वाहन चालक तात्काळ घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेसंदर्भात, जखमी माधुरी किशोर सपकाळे यांनी सोमवारी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चारचाकी वाहन चालकाविरोधात फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करत आहेत.



