चोपडा प्रतिनिधी । काल मध्यरात्री भांडुप येथील कोविड केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत तालुक्यातील कोरोना बाधीत दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे.
याबाबत वृत्त असे की, गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास भांडुप येथील मॉलमध्ये असणार्या कोविड केअर सेंटरला भीषण आग लागली. यात मुळचे चोपडा तालुक्यातील रहिवासी असणारे आबाजी नारायण पाटील (वय ६५) आणि त्यांच्या पत्नी सुनंदाबाई आबाजी पाटील (वय ६०) या दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला.
या दाम्पत्याचा मुलगा स्वप्नील आबाजी पाटील हा मुंबईत सेवेत आहे. आपले आई-वडील कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना उपचारासाठी भांडुप (पश्चिम)मध्ये सनराइज् कोविड हॉस्पिटलमध्ये पाच दिवसांपूर्वी नेले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. कोविड हॉस्पिटलला गुरुवारी मध्यरात्री आग लागली. त्यात या दाम्पत्याचा होरपळून मृत्यू झाला. यामुळे तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.