जागेच्या वादातून दाम्पत्याला लाकडी दांड्याने मारहाण; सात जणांवर गुन्हा

चोपडा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील तांदलवाडी गावात जागेच्या वादावरून ७ जणांनी दांपत्याला लाकडी काठीने मारहाण करून दुखापत केली तर महिलेच्या गळ्यातील पोत तोडून नुकसान केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील तांदलवाडी येथे रेखा गंगाधर धनगर या महिला आपल्या पती गंगाधर धनगर यांच्यासह वास्तव्याला आहेत. मजुरीचे काम करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. ८ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घराजवळील जागेच्या वादातून अमळनेर येथील मच्छिंद्र अशोक धनगर यांच्याशी भांडण झाले. त्यानुसार मच्छिंद्र अशोक धनगर, सोनू गोविंद धनगर, दीपक अनिल धनगर, राज धनराज भिल, राहुल दिलीप भोई, गणेश बारकू भोई आणि तुषार रोहिदास भोई सर्व रा. शिवाजीनगर अंमळनेर या ७ जणांनी घराजवळ येऊन पती-पत्नीला लाकडी दांडक्याने डोक्याला बेदम मारहाण केली आणि जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला. शिवाय रेखाबाई धनगर यांच्या गळ्यातील पोत तुटून पडल्याने त्याचे देखील नुकसान झाले आहे. या घटनेबाबत रेखा गंगाधर धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरोधात चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमरसिंग वसावे करीत आहे.

Protected Content