
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे फटाके फोडण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून एका दांपत्याला चौघांनी बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने (चॉपरने) गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अन्य दोघांनाही दुखापत झाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून बुधवारी (२२ सप्टेंबर) रोजी दुपारी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरसोली येथील पाण्याच्या टाकीजवळ मंगळवार, २१ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी छाया मुकेश पाटील (वय २९, रा. शिरसोली) यांच्या माहितीनुसार, त्यांच्या घरासमोर फटाके फोडण्याच्या कारणावरून संशयित आरोपी ज्ञानेश्वर युवराज पाटील, खुशाल माना बारी, बापू मिस्तरी, अमोल बंडू पवार (सर्व रा. शिरसोली) यांनी त्यांचे पती मुकेश अशोक पाटील (वय ३४) यांना शिवीगाळ करत जबर मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी आरोपींपैकी कैलास मिस्त्री याने आपल्या हातातील धारदार चॉपरने मुकेश पाटील यांच्या चेहऱ्यावर वार केले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या चेहऱ्याचे विद्रूपीकरण झाले आहे.
पतीला वाचवण्यासाठी आलेल्या फिर्यादी छाया पाटील यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि त्यांच्या उजव्या हाताच्या पंजाजवळ हत्याराने मारून दुखापत केली. इतकेच नव्हे तर, भांडण सोडवण्यास आलेले गोरक्ष शरद पाटील आणि गगन माधव चव्हाण यांनाही आरोपींनी धारदार शस्त्राने मारून जखमी केले.
आरोपींनी दांपत्याला जीवे ठार मारण्याची धमकीही दिली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. छाया मुकेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला संशयित आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र उगले करत आहेत. (शब्दसंख्या: २९०)



