
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नांद्रा येथे शेतीच्या वाटणीच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली आहे. या प्रकरणी रविवारी, १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान पुंडलिक गोसावी (वय ५०, रा. नांद्रा, ता. जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह नांद्रा येथे वास्तव्यास असून, शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. शनिवारी, ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भगवान गोसावी घरी असताना, त्यांचे चुलत भाऊ मनोहर भिकनगीर गोसावी, प्रेमगीर भिकनगीर गोसावी आणि तुषार मनोहर गोसावी (सर्व रा. नांद्रा, ता. जळगाव) हे त्यांच्या घरी आले.
यावेळी, “आमच्या शेतीची वाटणी का करत नाही?” असे बोलून तिघांनी भगवान गोसावी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. एवढेच नाही, तर त्यांना शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या घटनेसंदर्भात भगवान गोसावी यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, रविवारी, १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजता मारहाण करणारे मनोहर भिकनगीर गोसावी, प्रेमगीर भिकनगीर गोसावी आणि तुषार मनोहर गोसावी या तिघांविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चव्हाण हे करत आहेत.



