ओडीशामध्ये २४ वर्षांनतर होणार सत्तापालट; भाजपची मोठया विजयाकडे वाटचाल

पुरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ओडिशामध्ये सत्ताधारी बिजू जनता दलाला मोठा धक्का बसला असून, प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीने ओडिशातील लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये प्रभावी आघाडी घेतली आहे. भाजपा लोकसभेच्या एकूण २१ पैकी १८ जागांवर आघाडीवर आहे; तर विधानसभा निवडणुकीत १४७ जागांपैकी ७२ जागांवर आघाडीवर आहे.

ओडिशामध्ये १३ मे ते १ जून या चार टप्प्यांत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी पार पडल्या. केओंझार, पुरी, बोलंगीर, बारगढ, संबलपूर, ढेंकनाल, सुंदरगढ, भुवनेश्वर, जगतसिंगपूर व कालाहंडी या लोकसभा जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. सत्ताधारी बीजेडी केवळ जाजपूर व कंधमाल या दोन जागांवर आघाडीवर आहे आणि ती आघाडीही अगदी कमी फरकाची आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या आस्कासह अनेक बीजेडी उमेदवार पक्षाच्या बालेकिल्ल्यात पिछाडीवर आहेत. तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला समजली जाणारी कोरापुटची जागा काँग्रेसने कायम ठेवल्याचे दिसून येत आहे. २०१९मध्ये बीजेडीने लोकसभेच्या १२ जागा जिंकल्या होत्या. त्या निवडणुकीत भाजपाने आठ आणि काँग्रेसने एक जागा जिंकली होती. विधानसभा निवडणुकीतही सत्ताधारी बीजेडीला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण- मतमोजणीच्या दोन ते सहा फेऱ्यांनंतर पक्ष अत्यंत कमी फरकाने केवळ ४९ जागांवर आघाडीवर आहे. पटनाईक यांच्या मतदारसंघातील हिंजली येथील मतमोजणीचे आकडे अजून काहीही स्पष्ट करीत नसून, मुख्यमंत्री पश्चिम ओडिशातील कांताबंजी येथून पिछाडीवर आहेत. नवीन पटनाईक यांनी दोन विधानसभा मतदारसंघांतून निवडणूक लढवली आहे.

मतमोजणीच्या दोन फेऱ्यांनंतर भाजपाचे लक्ष्मण बाग ५२१ मतांनी आघाडीवर आहेत. मार्च २००० पासून राज्यात सत्ता गाजविणाऱ्या बीजेडीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ११२ जागा जिंकल्या होत्या. पुरी मंदिरातील रत्नभांडाराच्या हरविलेल्या चाव्यांच्या मुद्द्यावरून यंदा बीजेडीविरोधात जनतेचा रोष होता. बीजेडीविरोधातील आक्रमक मोहिमेचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसते.

Protected Content