जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील नेरी नाका येथील परिसरात शनी पोलिसांनी शुक्रवारी २८ मार्च रोजी दुपारी दोन वाजता एका रिक्षाचालकाकडून देशी कट्टा आणि जिवंत काडतूस जप्त करून त्याला अटक केली आहे. आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात गस्त आणि नाकाबंदी वाढवली असून, त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी शहरात कडक नजर ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गोपनीय माहिती मिळाली की, जळगावकडे येणाऱ्या एका रिक्षाचालकाकडे देशी कट्टा असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार, शुक्रवारी 28 मार्च रोजी दुपारी 2 वाजता पोलिसांनी नेरी नाका येथे सापळा रचला. काही वेळाने संशयित MH19CW6108 क्रमांकाच्या रिक्षास अडवून तपासणी केली असता, चालक राहुल रंगराव पाटील (वय 32, रा. कुसुंबा, गणपतीनगर, जळगाव) याच्याकडे लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल व मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळून आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस नाईक किरण वानखेडे, पोलीस कॉन्स्टेबल विकी इंगळे आणि रविंद्र साबळे यांनी केली.