Home Cities यावल यावल नगरपालिकेची मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर; नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष

यावल नगरपालिकेची मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर; नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष

0
129

यावल–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली असून, शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी सातोद रोडवरील यावल तहसील कार्यालयात होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, निकालाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी यावेळी चुरशीची लढत रंगली आहे. नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे गट) समर्थित छाया अतुल पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रोहिणी उमेश फेगडे यांच्यात थेट अटीतटीची निवडणूक झाली आहे. मात्र, या दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या विजय-पराजयाची गणिते शिंदे गटाच्या नगरसेवक उमेदवार सौ. स्वाती मनोहर पाटील यांच्या कामगिरीवर अवलंबून असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. त्यामुळे निकालाच्या दिवशी सर्वांचे लक्ष शिंदे गटाच्या भूमिकेकडे लागून राहणार आहे.

यावल नगरपालिकेच्या ११ प्रभागांतील एकूण २३ जागांसाठी तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले होते. शहरातील एकूण सुमारे ३३ हजार मतदारांपैकी ७३ टक्के मतदान झाले असून, तब्बल २४ हजार १७२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. ही टक्केवारी लक्षवेधी मानली जात असून, निवडणुकीतील चुरस यावरून अधोरेखित होते.

प्रभागनिहाय मतदानाचा आढावा घेतल्यास प्रभाग क्रमांक १ मध्ये एकूण ३५४१ मतदारांपैकी १६५८ मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक २ मध्ये ३४४१ पैकी २५६२, प्रभाग क्रमांक ३ मध्ये ३०९९ पैकी २३०४, तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये २२९९ पैकी १७०४ मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्रमांक ५ मध्ये एकूण २६०३ पैकी २१५० मतदारांनी मतदान करत तब्बल ८२.५९ टक्के मतदान नोंदवले, जे सर्वाधिक आहे.

प्रभाग क्रमांक ६ मध्ये २६५४ पैकी २०२२, प्रभाग क्रमांक ७ मध्ये २८३० पैकी २०७७, प्रभाग क्रमांक ८ मध्ये ३४३४ पैकी २५३७, प्रभाग क्रमांक ९ मध्ये २५८२ पैकी १९४०, प्रभाग क्रमांक १० मध्ये २४०० पैकी १६०५ मतदारांनी मतदान केले. सर्वात मोठ्या प्रभाग क्रमांक ११ मध्ये एकूण ५६१५ मतदारांपैकी ३५१३ मतदारांनी मतदान केले असून, येथे सर्वात कमी म्हणजे ६५.५१ टक्के मतदान झाले आहे.

उच्च मतदान टक्केवारीमुळे सर्वच राजकीय पक्षांना विजयाची आशा असून, मतमोजणीच्या दिवशी कोण बाजी मारणार याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. प्रशासनाने शांततेत व पारदर्शकपणे मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी कडक बंदोबस्त आणि आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.


Protected Content

Play sound