जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज नेटवर्क | गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या उत्सुकतेच्या पार्श्वभूमिवर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून यातील कल येत्या काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे.
जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात एकूण 139 उमेदवार रिंगणात होते. यामुळे प्रत्येक मतदारसंघात बहुरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. यात सर्वाधीक 29 उमेदवार हे जळगावातून तर सर्वात कमी 8 उमेदवार हे मुक्ताईनगर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. यंदाची निवडणूक ही अतिशय चुरशीची झाली. यात प्रामुख्याने गिरीश महाजन व गुलाबराव पाटील या दोन्ही मंत्र्यांसमोर तगडे आव्हान उभे राहिल्याचे दिसून आले. यासोबत एरंडोल, पाचोरा, मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव आणि चोपडा येथील लढती देखील लक्षवेधी ठरल्या.
निवडणुकीच्या काळात बहुतांश उमेदवारांनी जोरकसपणे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या. निवडणुकीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा, सी. आर. पाटील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आदी मातब्बर नेत्यांच्या सभा देखील झाल्या. निवडणुकीत यंदा मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचे देखील दिसून आले. मतदानाच्या दिवशी दुपार नंतर बऱ्याच ठिकाणी रांगा लागल्याची बाब देखील लक्षणीय मानण्यात आली. यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के इतके मतदान झाले. यानंतर सर्वांना मतमोजणीची उत्सुकता लागली होती.
या पार्श्वभूमिवर, आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्या-त्या ठिकाणी मोजणी करण्यात येत असून यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. पहिल्यांदा टपालाने करण्यात आलेली मते मोजण्यात येणार असून नंतर फेरीनिहाय मतमोजणी होणार आहे. यामुळे साधारणत: दोन-तीन तासांमध्ये प्रत्येक मतदारसंघातील कौल समजून येणार आहे. आम्ही लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून यातील प्रत्येक अपडेटस आपल्याला देणार आहोत.