जळगाव प्रतिनिधी । पंतप्रधान कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गैरप्रकार करून तब्बल ४५ लाखांचे अनुदान लाटल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
याबाबत माहिती अशी की, भारती गजेंद्रसिंग परदेशी (रा.रायपूर) यांचे पती गजेंद्रसिंग परदेशी यांनी सन २०१५ मध्ये मॅजिक वर्ल्ड ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन या प्रशिक्षण केंद्रात पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत अॅनिमेशनचे प्रशिक्षण घेतले. यादरम्यान त्यांची प्रशिक्षण केंद्राचे मालक भूषण बक्षे याच्यासोबत परिचय झाला. त्याने नोंदणीकृत संस्था असल्यास महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य, उद्योजकता विकास अभियानाचे केंद्र सुरू करता येईल. एजंट म्हणून काम करीत असल्याचेही त्याने सांगितले. दरम्यान, परदेशी यांची घन:श्याम जयराम राजपूत बहुउद्देशीय संस्था, रायपूर ही नोंदणीकृत संस्था असून त्यांनी संस्थेची सर्व कागदपत्रे, तसेच ई-मेल आयडी व मोबाइल क्रमांकत्याला दिला.
यानंतर संबंधतीत प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. शासनाकडे मयूरेश्वर स्कूल ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशन हनुमान टेकडी, रायपूर या नावाने सेंटर नोंदणी करण्यात आले. ३१ ऑक्टोबर २०१६ रोजी शासनाकडून नोंदणी क्रमांक मिळाला. यानंतर मात्र बक्षे याने त्याने पत्नी शीतल भगवान पाटील अध्यक्ष असलेल्या निमजाई फाउंडेशनच्या बँक खात्यावर अनुदानाचे पैसे वर्ग केले.
निमजाई फाउंडेशनचे सदस्य भारत अरविंद भंगाळे, मोहिनी भारत भंगाळे, भगवान दगडू पाटील, राजेश नरेंद्र नारखेडे यांनी प्रशिक्षण केंद्राच्या अनुदानाची रक्कम हडप करण्यासाठी खोटा ठराव करून अनुदानापोटी येणारी ४५ लाख रक्कम परस्पर निमजाई फाउंडेशन संस्थेच्या खात्यावर जमा करून फसवणूक केली, अशी फिर्याद भारती परदेशी यांनी एमआयडीसी पोलिसात दिल्यानंतर भादंवि कलम ४२० व इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.