रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीत ग्रामीण भागातील जनतेच्या शोषणाच्या तक्रारी वाढत असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अधोरेखित केले. वरकमाईसाठी जनतेला वेठीस धरल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी आढावा बैठकी दरम्यान दिला. रावेर तहसील कार्यालयात सर्व विभागांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम यांसह सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पंचायत समितीत गोठा योजनेचे प्रभारी दिपक चौधरी यांच्यावर गोठा मंजुरीसाठी वरकमाई केल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. या तक्रारींवर आमदार पाटील यांनी कठोर शब्दांत नाराजी व्यक्त करत चौधरी यांना चांगलेच खडसावले. बैठकीत महसूल विभागाच्या कामगिरीचे आमदार पाटील यांनी विशेष कौतुक केले. तहसीलदार बंडू कापसे व निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या नेतृत्वाखालील टीम जनतेच्या कामांसाठी सातत्याने परिश्रम घेत असल्याचे त्यांनी नमूद केले. महसूल विभागाच्या कामांप्रमाणेच इतर विभागांनीही आपली कार्यक्षमता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीस भाजप रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस हरलाल कोळी, लाडकी बहीण योजना प्रमुख राहुल पाटील, तालुका सरचिटणीस दुर्गेश पाटील, छोटू पाटील, डॉ. दीपक सोलंकी, बीडीओ वानखेडे, मुख्याधिकारी समीर शेख, गटशिक्षण अधिकारी विलास कोळी, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, कृषी अधिकारी वागळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे तायडे यांसह सर्वच विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आढावा बैठकीत जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश देण्यात आले. तसेच, जनतेच्या सेवेसाठी प्रशासनाने प्रामाणिक व पारदर्शक काम करावे, असे आवाहन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले.