धरणगाव (प्रतिनिधी) येथील शासकीय विश्रामगृहात एका नगरसेवकाने अश्लील शिवीगाळ करत नुकताच मोठा धिंगाणा घातल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर तो नगरसेवक कोण? अशी एकच चर्चा शहरात सुरु आहे.
या संदर्भात सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साधारण दोन ते तीन दिवसापूर्वी एक नगरसेवकाचा एका महिला अधिकाऱ्याशी खाजगी कामावरून काही तरी वाद होता. संबंधित महिला अधिकाऱ्याने बेकायदेशीर काम करण्यास नकार दिल्यामुळे आगडोंब झालेला नगरसेवक आपल्या समर्थकांसह थेट शासकीय विश्रामगृहात पोहचला.अपमान झाल्याच्या भावनेतून त्या नगरसेवकाचा संयम सुटला आणि त्याने संबंधित महिला अधिकाऱ्यास अश्लील शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.अर्थात ती महिला अधिकारी तेथे उपस्थित नव्हती.परंतु आपण किती डेरिंगबाज आहोत, हे कार्यकर्त्यांना दाखवण्याचा नादात हा नगरसेवक मोठ-मोठ्याने शिवीगाळ करत धिंगाणा घालत होता. या प्रकारामुळे शेजारी राहणाऱ्या महिला मात्र, खजील होत,घरात चालल्या गेल्यात. आपल्या कार्यकर्त्यांसमोर अपमान झाल्याच्या भावनेतून हा नगरसेवक अस्वस्थ झाला होता. म्हणून याला,त्याला फोन लावून मी अमुक करेन,ढमुक करेन म्हणून सांगत होता.धिंगाणा घालणारा नगरसेवक बाहेरगावचा असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या नगरसेवकावर याआधी देखील जळगावातील एका शासकीय कार्यालयात घुसून शिवीगाळ करत गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे कळते. दरम्यान,धरणगावच्या शासकीय विश्रामगृहात नेहमी काही ना काही गोंधळ सुरूच असल्याची ओरड नेहमीच होत असते. अगदी काही जण या रेस्टहाऊसचा भर दिवसा दारू पिण्यासाठी देखील उपयोग करतात,असेही कळते.