Home क्राईम पारोळ्यात आग विझवण्यासाठी नगरसेवक सरसावले 

पारोळ्यात आग विझवण्यासाठी नगरसेवक सरसावले 


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये आज सकाळी घडलेल्या आगीच्या घटनेत नगरसेवक पंकज मराठे यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. सावजी हॉटेलच्या पाठीमागील एका गोडाऊनला अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळच्या सुमारास गोडाऊनमधून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागताच स्थानिक नागरिकांनी याची माहिती नगरसेवक पंकज मराठे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वेळ न दवडता नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाला घटनास्थळी पाचारण केले आणि प्रशासनाशी संपर्क साधला.

नगरपरिषद कर्मचारी, सहकारी तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या. विशेष म्हणजे नगरसेवक पंकज मराठे यांनी केवळ मार्गदर्शन न करता स्वतः हातामध्ये अग्निशमन बंब घेऊन आग विझवण्यासाठी प्रत्यक्ष सहभाग घेतला. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे इतर कर्मचाऱ्यांनाही काम करण्याचा उत्साह मिळाला.

सर्वांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग वेळीच आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, तसेच आसपासच्या इमारतींना आग पसरण्यापासून रोखण्यात यश आले. त्यामुळे संभाव्य मोठा आर्थिक व मानवी अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

या घटनेनंतर नगरसेवक पंकज मराठे यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आमदार अमोल पाटील, नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील तसेच शहरातील सर्व नगरसेवक व नगरसेविकांनी त्यांच्या कार्याचे अभिनंदन केले आहे. लोकप्रतिनिधीने प्रसंगी स्वतः पुढे येऊन मदत केल्याने नागरिकांमध्ये विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र आहे.


Protected Content

Play sound