मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक २०२५ चा निकाल जाहीर होऊन अवघे काही दिवस उलटत नाहीत, तोच मुक्ताईनगर शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये विकासकामांना गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेना (शिंदे गट) चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद भारंबे यांनी निवडणूक जिंकल्यानंतर थेट ‘ॲक्शन मोड’मध्ये जात नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी प्रत्यक्ष मैदानात उतरल्याने शहरात सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे.
प्रभाग १४ मधील नागरिकांना दीर्घकाळापासून त्रास देणाऱ्या ब्लॉकेज झालेल्या गटारीची पाहणी नगरसेवक प्रमोद भारंबे यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन केली. पावसाळ्यात साचणारे पाणी, दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या यामुळे नागरिक त्रस्त होते. ही बाब लक्षात घेत पाहणीनंतर त्या ठिकाणी नवीन गटार बांधण्याची तयारी तात्काळ सुरू करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

निवडणूक प्रचारादरम्यान दिलेल्या आश्वासनांपुरते न थांबता निवडून येताच कामांना हात घातल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. “प्रभागातील जनतेच्या समस्या सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. गटारी, रस्ते, पाणीपुरवठा तसेच इतर मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल,” असे नगरसेवक प्रमोद भारंबे यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाहणीदरम्यान नवीन गटार कशा पद्धतीने उभारता येईल, त्याचा तांत्रिक आढावा घेतला गेला. यावेळी योगेश इंगळे, स्वप्नील पाटील, ललित पाटील, विजय पाटील, निवृत्ती कोलते यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. नागरिकांनी आपल्या समस्या मांडत सुरू झालेल्या कामाबाबत समाधान व्यक्त केले आणि पुढील काळातही अशीच तत्परता कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
निवडणुकीनंतर लगेचच विकासकामांना सुरुवात झाल्याने प्रभाग क्रमांक १४ मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. येत्या काळात रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसह विविध विकासकामे मार्गी लागतील, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त होत असून नगरसेवकांच्या ‘ॲक्शन मोड’ची चर्चा शहरभर होत आहे.



