पणजी (वृत्तसंस्था) देशाला मंदीतून सावरण्यासाठी आज देशांतर्गत कंपन्या आणि नव्या देशांतर्गत उत्पादन कंपन्यांच्या कॉर्पोरेट टॅक्सच्या दरात कपात करण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
गेला काही काळ मंदीची भीती व्यक्त करण्यात येत होती. विशेषत: गेल्या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी अवघ्या पाच टक्क्यांनी वाढल्याच्या तसेच गेल्या वर्षभरात वाहन उद्योग क्षेत्राला लागलेल्या ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उद्योग क्षेत्राला उभारणी देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने नमूद केले असून शेअर बाजाराने अर्थात गुंतवणूकदारांनी याचे स्वागत केले आहे. अर्थमंत्री सीतारमण यांच्या करातील कपातीच्या या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. शेअर बाजाराचा निर्देशांक 1600 अंकांनी वाढला. यासह सेंसेक्सने 37 हजारांचा टप्पा पार केला. निफ्टीने देखील 11 हजारांच्या टप्प्याला स्पर्श केला. सेंसेक्सच्या सर्व 30 शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळाली.
केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या घोषणेला बळ देण्यासाठी सरकारनं प्राप्तिकर कायद्यात तरतूद केली आहे. चालू आर्थिक वर्ष २०१९-२०मध्ये १ ऑक्टोबरनंतर उत्पादन प्रक्रियेत गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांकडे १५ टक्के दरापासून प्राप्तिकर भरण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे. म्हणजेच १ ऑक्टोबर २०१९ किंवा त्यानंतरच्या भरतीय कंपन्यांना १५ टक्के कर भरावा लागेल. ३१ मार्च २०२३पूर्वी उत्पादन घेण्यास सुरुवात केली तर १५ टक्के कर भरावा लागेल. सर्व प्रकारचे अधिभार आणि सेस मिळून एकूण १७.१० टक्के प्रभावी दर आकारला जाणार आहे.