जळगाव प्रतिनिधी । शहरात आज जवळपास ५०० वृत्तपत्र विक्रेते असून त्यांची देखील अँटीजन टेस्ट किटद्वारे कोरोना चाचणी करावी अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.
जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून तपासणीचे प्रमाण देखील वाढले आहे. मनपाकडे विनंती केल्यानंतर शहरातील हॉकर्स आणि अत्यावश्यक सेवा विक्रेत्यांची अँटीजन टेस्ट करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक रुग्ण समोर येऊ लागले आहे. जळगाव शहरात आज जवळपास ५०० ते ६०० वृत्तपत्र विक्रेते असून त्यांचा नागरिकांशी दैनंदिन संपर्क येत असतो. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या संघटनेशी चर्चा करून शहर वासियांच्या आरोग्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या तपासणीसाठी शिबिराचे आयोजन करावे, त्यांना एक ठिकाण आणि दिवस तपासणीसाठी निश्चित करून घ्यावा, अशी विनंती महापौर सौ.भारती सोनवणे यांनी मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.