मुंबई , वृत्तसंस्था ।गायिका लता मंगेशकर राहत असलेल्या मुंबईतील पेडर रोडवरील प्रभुकुंज सोसायटीत करोनाचा रुग्ण आढळल्याने मुंबई महापालिकेने ही इमारत सील केली आहे. या इमारतीत बरेच बुजुर्ग व्यक्ती राहत असल्याने मुंबई महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून ही कार्यवाही केली.
ही संपूर्ण सोसायटी सॅनिटाइज करण्यात येणार असून सोसायटी परिसरात औषध फवारणीही केली जाणार आहे. या सोसायटीत लता मंगेशकर यांच्यासह त्यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर आणि बहीण उषा मंगेशकर राहतात.
दरम्यान, पालिकेच्या कार्यवाही नंतर लता मंगेशकर यांना विचारपूस करणारे फोन येऊ लागल्याने त्यांनी पत्रक काढून त्याबाबतची माहिती दिली आहे. प्रभुकुंज सोसायटी बंद करण्यात आली आहे का? याची विचारणा करणारे फोन आम्हाला येत आहेत. संसर्गापासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, असं लता मंगेशकर यांनी निवेदनात म्हटलं आहे.
आमच्या सोसायटीत साधेपणानेच गणेशोत्सव साजरा केला जात आहे. आमच्या कुटुंबातील सर्वांची प्रकृती उत्तम आहे. त्यामुळे कुटुंबीयांबाबत कृपया कोणीही अफवा पसरवू नका. एक कुटुंब म्हणून सोसायटीतील सर्वजण सतर्क असून नियमांचं काटेकोरपालन करत आहेत., असंही त्यांनी म्हटलं आहे.