मुंबई प्रतिनिधी । कोरोनाचा हाहाकार हा राज्यच नव्हे तर संपूर्ण देशात पहायला मिळत असून गत चोवीस तासांमध्ये तब्बल १ लाख ५२ हजार कोविड बाधीत रूग्ण आढळून आले असून ही आजवरची एका दिवसातील सर्वाधीत पेशंट संख्या ठरली आहे.
याबाबत वृत्त असे की, प्रयत्नांची शर्थ करूनही कोरोनाचा संसर्ग आता भयंकर पातळीवर पोहचल्याचे दिसून येत आहे. यात देशभरात याचा संसर्ग वाढलेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात शनिवारी दिवसभरात ५५ हजार ४११ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ३०९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.७२ टक्के इतका आहे. ५३ हजार ००५ रुग्ण करोनातून बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८२.१८ टक्के एवढे झाले आहे.