जळगाव, प्रतिनिधी |पाचोरा येथील हनुमाननगर भागात राहणाऱ्या दीपक रामा निकम, (वय ३६) यांच्या खुनप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने आरोपी रावसाहेब रामा निकम, (वय ४४) यास जन्मठेप व ५०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, दि.१७/०४/२०१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दीपक रामा निकम यांची पत्नी गावाला गेली असताना व त्यांचा मुलगा घरी असताना आरोपी रावसाहेब रामा निकम यांचेत व मयत दिपक याचेत बाथरुमचा वास येतो या कारणावरुन वाद होवून पाणी जास्त टाकत जा असे
दिपकने आरोपी रावसाहेब यास सांगितल्याने आरोपी रावसाहेब यास राग आला. रागाच्या भरात सु-याने दीपक याच्या पोटावर व छातीवर गंभीर वार केल्याने दीपक गंभीर जखमी झाला. त्याचेवर अॅपेक्स हॉस्पीटल जळगाव येथे उपचार सुरु असताना आरोपी रावसाहेब याने केलेल्या गंभीर जखमांमुळे दिनांक १९/०४/२०१७ रोजी त्याचा मृत्यू झाला.
याबाबत उपचार सुरु असताना पोलिसांनी त्याचा मृत्यूपूर्व जबाब नोंदविला होता. त्यानुसार पाचोरा पोलिस स्टेशन येथे गु.र.न. ७१/२०१७ भा.दं.वि. कलम ३०७ अन्वये आरोपीविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्यानंतर उपचारादरम्यान दिनांक १९/०४/२०१७ रोजी दिपक याचा मृत्यू झाल्याने आरोपीविरुध्द भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये कलम वाढून गुन्हयाची नोंद करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचा तपास सहा. पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे, पोलिस निरिक्षक नवलनाथ तांबे यांनी केला व पोलिस निरिक्षक धनंजय येरुळे यांनी न्यायालयात
दोषारोपपत्र दाखल केले होते. सदरचा खटला जळगांव सत्र न्यायालयात न्या.एस.जी. ठबे यांचेसमोर चालला. त्यात सरकारपक्षातर्फे एकूण १७ साक्षीदार तपासण्यात
आले. यात मयताचा मुलगा तथा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निखील तसेच मयताची पत्नी संगिता, वहिनी अनिता तसेच डॉ.अर्जुन सुतार, डॉ.सचिन इंगळे, दाखल अंमलदार पोलिस उपनिरिक्षक आर.आर. भोर, तपास अधिकारी सहा. पोलिस निरिक्षक अविनाश आंधळे, पोलिस निरिक्षक नवलनाथ तांबे यांच्या साक्षी खुप महत्वपूर्ण ठरल्या.
न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्याअंती न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३०२ खाली जन्मठेप आणि रुपये ५०,०००/- दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीस ठोठावण्यात आलेल्या दंडाची रक्कम रुपये ५०,०००/- पैकी रक्कम रुपये ४५,०००/- मयत दीपक याच्या पत्नीला देण्याचा आदेश न्यायालयाने पारित केलाआहे. याकामी सरकार पक्षातर्फे अति. शासकीय अभियोक्ता वैशाली एस. महाजन यांनी तर आरोपीतर्फे अॅड. सागर चित्रे यांनी कामकाज पाहिले.