नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उद्धव ठाकरे यांचा ग्रामीणचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरी तालुक्यावर शिंदे गटाने लक्ष केंद्रित करीत येथील माजी आमदार धनराज महाले यांना दोन वर्षांपूर्वीच गळाला लावले आहे. पण दिंडोरीची जागा नरहरी झिरवाळ लढणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटील आणि अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केली. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपल्या नाशिक दौ-यात नरहरी झिरवाळ यांच्या उमेदवारीची घोषणा केली. नरहरी झिरवाळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दिंडोरीचे शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार धनराज महाले नाराज आहेत.
शिवसेनेत प्रवेश केला तेव्हाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला उमेदवारी देण्याचा शब्द दिला आहे, असा दावा धनराज महाले यांनी केला आहे. झिरवाळ कुटुंबियांकडून लोकसभेत महायुतीच्या विरोधात काम केल्याचा आरोप महाले यांनी केला आहे. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार धनराज महाले यांनी नागपूर येथे शिंदे गटात प्रवेश केला होता.