जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील केकतनिंभोरा गावाला पिण्याचे पाणी हे अत्यंत दूषित येत असल्यामुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवासांकडून होत आहे.
गावात असलेली शासकीय पाणी पुरवठा विहिरीवरून गावाला पाणी सोडले असता हे पाणी दूषित असल्याचे प्राथमिक पातळीवर दिसून येत आहे. कारण सार्वजनिक विहिरीमध्ये जे पाणी येत आहे, ते नदी पात्रातून झिरपत असते. आणि या पाण्यात शौचालयाचे पाणी एकत्र होत असल्याचे ग्रामस्थांचे भाकीत आहे. त्यामुळे गावात अनेक ग्रामस्थांना अंगाला खाज येणे, गळा दुखणे, खोकला येणे, अॅलर्जी, सर्दी यासारखे आजार होत असून या पाण्याने चहा फुटणे, डाळ न शिजने, पाण्यावर क्षार येणे अश्या स्वरूपात तक्रारीचा पाऊस गावात पडत आहे. या दूषित पाण्याचा पुरवठा बंद करुन वाघूर येथील पाणीपुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
गावात दुषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. आरोग्य सेवकांनी दूषित पाण्याचे नमुने घेतले असून त्याबाबत ग्राम पंचायतला पत्र ही दिलेले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पाणी गळतीकडे लक्ष देऊन गावाला स्वच्छ व चांगल्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.