शिरपूर प्रतिनिधी । येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी आपल्या सहकार्यांसह महामार्गावर सापळा रचत दि.१४ सप्टेंबर रोजी पहाटे कंटेनर चालकासह 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरपूर जवळ सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त वार्ता पोलिसांना मिळाल्याने येथील कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी आपल्या सहकार्यांसह महामार्गावर मध्यरात्रीपासून सापळा रचला होता. पहाटे ५ वाजता मध्यप्रदेशाकडून शिरपूरकडे येणाऱ्या कंटेनर क्रमांक (आरजे. ५२ जीए. ३९६१) ला पोलिसांना संशय आला. त्यांनी या कंटेनरला थांबवल्यावर कंटेनर चालकास विचारपूस केली, मात्र कंटेनर चालक उडावाउडवीचे उत्तरे देत असल्यामुळे पोलिसांचा अंदाज पक्का झाला. यावेळी पोलिसांना सुगंधित तंबाखूचा उग्र वास येत असल्याने कंटेनरची तपासणी करण्यास सुरुवात केली. तर कंटेनरमध्ये आगळेवेगळे साहित्याच्या आजुबाजुला बंदी असलेली सुगंधित तंबाखू खोके आढळून आले. आणि पोलिसांनी कंटेनर चालकास ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत प्रभात टोबँको व रत्ना प्रिमियम टोबँकोचे १२ हजार २८० टीन व ६ हजार ८०० कागदी पुड्या असे एकूण ८५ लाख ५३ हजार २०० रुपयांचा सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल शिरपूर पोलिसांनी रितसर कारवाई करत जप्त केला. कंटेनरसह या मुद्देमालाची एकूण किंमत १ कोटी ५३ हजार २०० रुपये आहे. या कारवाईबाबत धुळे येथील अन्न व औषध प्रशासनाला सुचित केल्यावर धुळ्याचे अन्न व सुरक्षा अधिकारी आनंदा पवार हे शिरपूर येथे आल्यावर मुद्देमालाची पाहणी केली. पवार यांच्या फिर्यादीवरून संशयित कंटेनर चालक रमजान नसरूद्दीन (४३) रा.नसरु ता.डुंगरपूर जिल्हा पलवल, हरियाणा चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंटेनर सुगंधित तंबाखू घेऊन, दिल्ली येथून कोल्हापूरकडे जाणार असल्याची माहिती चालकाने दिली. तत्पूर्वीच शिरपूर पोलिसांनी कारवाईचा भडका उचलला असून घटनेचा तपास सहाय्यक निरीक्षक सी.बी. पाटील करीत आहेत. धुळे पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे, अप्पर अधीक्षक डॉ. राजू भुजबळ, शिरपूर डीवायएसपी अनिल माने यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर पोलिस ठाण्याचे पो.नि.शिवाजी बुधवंत, एपीआय सी.बी.पाटील, पीएसआय किरण बाऱ्हे हवालदार नाना मोरे, सपकाळे, सनी सरदार, संदीप रोकडे आदींनी कारवाई केली.