Home प्रशासन बांधकाम मजुरांना बनवले ‘ऊसतोड मजूर’, अमोल बोदडे यांचा गंभीर आरोप

बांधकाम मजुरांना बनवले ‘ऊसतोड मजूर’, अमोल बोदडे यांचा गंभीर आरोप


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील ऊसतोड कामगार नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अमोल बाबुराव बोदडे यांनी केला असून, या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अमोल बाबुराव बोदडे यांनी केलेल्या तक्रारीनुसार, ऊसतोड कामगार नोंदणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असून प्रत्यक्षात बांधकाम मजुरांनाच ऊसतोड मजूर म्हणून नोंदवले जात आहे. या प्रक्रियेत काही दलाल सक्रिय असून ते प्रत्येकी एक हजार ते दोन हजार रुपये घेऊन नोंदणी करून देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे आर्थिक लूट सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र अनिवार्य असतानाही कोणतीही पडताळणी न करता मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. योग्य पडताळणी न झाल्याने अपात्र व्यक्तींना योजनांचा लाभ मिळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, गावागावांत अनधिकृत कॅम्प घेऊन नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि स्थानिक प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दलालांना राजकीय पाठबळ असल्याची चर्चा देखील रंगत असून या घोटाळ्याची व्याप्ती अधिक गंभीर असल्याचे चित्र दिसत आहे.

बोदडे यांनी पुढे सांगितले की, जे बांधकाम मजूर आधीच बांधकाम कल्याण मंडळाच्या योजनांचा लाभ घेत आहेत, त्यांनाच पुन्हा ऊसतोड मजूर म्हणून दाखवून दुहेरी लाभ मिळवून दिला जात आहे. या प्रकारामुळे शासनाची फसवणूक होत असून खरे आणि पात्र ऊसतोड कामगार मात्र योजनांपासून वंचित राहत आहेत.

या सर्व प्रकरणावर त्यांनी प्रशासनावर जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कठोर टीका केली आहे. ऊसतोड व बांधकाम मजुरांची संयुक्त पडताळणी करून अशा फसवणुकीला आळा घालावा आणि संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ग्रामपंचायतीमार्फत पारदर्शक पद्धतीने राबवावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

जर या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली नाही, तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही अमोल बाबुराव बोदडे यांनी दिला असून, यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound