धानोरा ता.चोपडा (वार्ताहर) वेळोवेळी गावातील भ्रष्टाचार समोर आणत असल्यामुळे मला पदापासुन दुर करण्याचे षडयंत्र सरपंच व त्यांचे पती करत असल्याचा आरोप येथील उपसरपंच अशोक साळुंखे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी गावात पत्रकार परीषद घेत आरोप केले आहेत. दरम्यान, अपात्रतेच्या निकालाचे आदेश चार महिन्यांनी ग्रामपंचायतमध्ये सरपंच किर्ती पाटील यांचे पती किरण पाटील यांनी आणून दिल्यानंतर धानोऱ्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.
याबाबत सविस्तर असे की,उपसरपंच अशोक सुकदेव साळुंखे यांनी वेळेत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द केल्याचे आदेश नुकतेच ग्रामपंचायतीला मिळाले आहेत. धानोऱ्याचे सरपंच किर्ती पाटील यांचे पती किरण पाटील यांनी या संदर्भात चार महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात पडून असलेला निकाल नुकताच काढून आणला. यामुळे उपसरपंच अशोक साळुंखे यांनी पत्रकार परीषद घेऊन, उपसरपंच या पदावर चार वर्षापासुन या पदावर कार्यरत आहे. सर्व सुरळीत होते. पण गेल्या दिड वर्षापासुन सरपंच किर्ती पाटील यांचे पती किरण पाटील यांनी हस्तक्षेप सुरु करुन अनेक योजनांमध्ये अपहार केला. स्वहितासाठी शासनाचा पैशांची लुटमार सुरु केली. त्यात दलित वस्ती, चौदावा वित्त आयोग, ग्रामनिधी तसेच कोट्यावधी रुपये किंमती असलेली ग्रामपंचायत मालकीची जागा लाखो रुपये घेऊन एका संस्थेला देण्यासाठी ग्रामपंचायत कडून ना हरकत दिलेला दाखला, या सर्व गोष्टीसाठी मी प्रखर विरोध केला होता. सरपंच पती यांनी ग्रामसेवक यांना हाताशी धरुन बिनधास्त लुटमार सुरु केलेली आहे. मी विरोध केला असता, मला वेळोवेळी पोलिस स्टेशनची धमकी देऊन तक्रार देण्यात आल्या. माझ्या भाऊ बंदकीत अनेक लोकांकडे जातीचे वैधता प्रमाणपत्र असतांनाही माझ्या जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेऊन मला अपात्र करणेसाठी प्रयत्न सुरु असल्याचे श्री.साळुंखे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मला फसविण्यासाठी सरपंच पती यांचा हा सर्व खेळ आहे. तरी माझ्या जातीच्या दाखल्याची वैधता येण्यासाठी तांत्रिक अडचणीमुळे मला मिळण्यास वेळ झाला आहे. लवकरच मी प्रमाणपत्र सादर करेल. मला माझे सदस्यत्व रद्द झाले आहे असे, वैयक्तिक कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही,असे देखील अशोक सुकदेव साळुंखे यांनी सांगितले. तर सध्या निवडणुकीच्या कामात मी व माझे कर्मचारी व्यस्त आहे. धानोरा प्रकरणाची माहीती माहीत नाही. सोमवारी कामकाज सुरु होताच प्रकरण हाताळतो,अशी प्रतिक्रीया चोपडा तहसिलदार अनिल गावित यांनी दिली आहे.