मुंबई । संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सक्रीय पाठिंबा देत महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. यासंदर्भात बाळासाहेब थोरात म्हणाले की, या कृषी कायद्याविषयी शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. शेतकऱ्यांच्या या लढाईत काँग्रेस पक्ष नेहमीच भक्कमपणे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे काळे कायदे रद्द करावेत हीच काँग्रेसची भूमिका राहिली आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलने ही केली आहेत.
शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.