मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची मुंबई विभागीय समिती उद्या, शनिवारपासून १६ दिवस न्याय यात्रा काढणार आहे. मुंबादेवी मंदिरातून सुरू होणारी यात्रा दररोज मुंबईतील दोन विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. या यात्रेमध्ये महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा भांडाफोड केला जाणार असून जागोजागी कोपरा सभा घेण्यात येणार आहेत.
यात्रेचे नेतृत्व खासदार वर्षा गायकवाड करणार आहेत. मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघात न्याय यात्रा जाणार आहे. यासंदर्भात वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात न्याय यात्रेदरम्यान सभा घेऊन जनतेच्या स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे. मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटण्याचे काम गेली दोन वर्षे राज्यातले महायुती सरकार करत आहे, त्यासंदर्भात मुंबईकरांना माहिती देण्यावर यात्रेचा मुख्य भर असणार आहे.