लखनौ वृत्तसंस्था | उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष ४० टक्के महिलांना उमेदवारी देणार असल्याची माहिती घोषणा आज प्रियंका गांधी यांनी केली आहे.
उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची सूत्रे प्रियंका गांधी यांनी घेतल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने त्यांनी आज लखनऊमध्ये महत्वाची घोषणा केली. त्या म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष महिला उमेदवारांना ४० टक्के तिकिटे देईल. यासोबतच त्यांनी महिला समाजसेविका, शिक्षिका, महिला पत्रकार आणि इतर सेवांशी संबंधित महिलांना राजकारणात येण्याचे आवाहनही केले. त्या म्हणाल्या की, ज्याला स्वारस्य असेल त्यांनी पुढे येऊन अर्ज करा, आम्ही त्यांना तिकीट देऊ.
प्रियंका पुढे म्हणाल्या की, मी एक मुलगी आहे, मी लढू शकतोफ हा कॉंग्रेसचा नारा आहे.आम्हाला पुढे जायचे असेल तर महिलांना राजकारणात यावे लागेल. गुणवत्तेच्या आधारावर महिलांना तिकीट दिले जाईल. आपल्याला जाती धर्माच्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. महिलांना समान अधिकार देण्यात येणार असून याची सुरुवात ४० टक्क्यांपासून होत आहे. आगामी काळात ५० टक्के महिलांना तिकिटे दिली जातील. प्रियंका गांधी म्हणाल्या की, इच्छुक असलेल्या कोणत्याही महिला त्यांच्या विधानसभेतून फॉर्म घेऊन अर्ज करू शकतात. महिलांना पुढे जायचे आहे, निवडणूक लढवण्यासाठी कॉंग्रेस त्याला मदत करेल.