चंदीगढ (वृत्तसंस्था) पंजाबमधील मोगा येथील राहुल गांधी यांच्या रॅलीमध्ये काँग्रेसचे आमदार आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांना बोलण्यापासून रोखण्यात आले होते. यावरून ‘जर मी राहुल गांधी यांच्या सभेमध्ये बोलण्यासाठी योग्य नसेन, तर एक प्रवक्ता किंवा प्रचारक म्हणूनही अयोग्य असून काँग्रेसने माझी जागा दाखविल्याचे नाराज झालेल्या सिद्धुंनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांची कर्जमाफीच्या योजनेसाठी मोगा येथे रॅली आयोजित केली होती. यावेळी सिद्धूही उपस्थित होते. या सभेचे आयोजन मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी केले होते. यावेळी सिद्धू यांना भाषण देण्यास मनाई करण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या सिद्धू यांनी, या सभेने मला माझी जागा दाखवून दिली. तसेच निवडणुकीसाठी कोण कोण प्रचार करणार याबाबत माहिती नसल्याचेही सांगितले. दरम्यान, आयोजक सुखजिंदर सिंग रंधावा यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी भाषणासाठी केवळ 4 जणांची नावे देण्यास सांगितले होते. यानंतर राहुल गांधी यांना कांगडा येथील सभेला जाण्यास उशिर होत आहे, यामुळे जाखड, आशा कुमारी आणि राहुल गांधीच भाषण करतील, असे सांगण्यात आले.