धुळे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसला धुळे लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला असून नाशिक ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळे यांनी १२ मे रोजी आज धुळयात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मंत्री जयकुमार रावल, धुळे लोकसभेचे उमदेवार डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते. तुषार शेवाळे यांच्यासोबत मालेगाव काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तुषार शेवाळे हे धुळे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते धुळे व नाशिक जिल्ह्यात सक्रीय होते.
काँग्रेसने धुळे लोकसभेसाठी डॉ. शेवाळे व धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हे प्रबळ दावेदार असतानाही त्यांचा पत्ता कट करत नाशिकच्या माजी महापौर डॉ. शोभा बच्छाव यांना धुळ्यातून उमेदवारी देण्यात आली. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर डॉ. तुषार शेवाळे आणि शाम सनेर यांनी आयात उमेदवार चालणार नाही, अशी भूमिका घेत आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. यानंतर शोभा बच्छाव या मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीत डॉ. शेवाळे व पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी घ्यायला आल्या असताना त्यांना जोरदार विरोध करण्यात आला होता. यानंतर श्याम सनेर यांची नाराजी दूर करण्यास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना यश आले होते. धुळ्यात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचे कालच काँग्रेस पक्षातून ६ वर्षांकरिता निलंबन करण्यात आले होते.
धुळयात काँग्रेसला धक्का; प्रदेश सरचिटणीस तुषार शेवाळे यांचा भाजपमध्ये प्रवेश
6 months ago
No Comments