Home राजकीय मिरा-भाईंदरमध्ये भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस-शिंदे गटाची युती

मिरा-भाईंदरमध्ये भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस-शिंदे गटाची युती


मिरा-भाईंदर-वृत्तसेवा ।  मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या निकालांनंतर शहराचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ७८ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवून सत्ता राखली असली, तरी आता विरोधी पक्षांनी अनपेक्षित राजकीय खेळी करत भाजपसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. काँग्रेस आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) या दोन परस्परविरोधी विचारधारेच्या पक्षांनी एकत्र येत ‘मिरा-भाईंदर शहर विकास आघाडी’ स्थापन केली आहे. या नव्या आघाडीमुळे महापालिकेतील गणिते बदलली असून, सत्तेत एकत्र असलेले पक्ष स्थानिक पातळीवर मात्र आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या या आघाडीची अधिकृत नोंदणी काल कोकण भवन येथे पूर्ण करण्यात आली. या नव्या ‘शहर विकास आघाडी’च्या नेतेपदी काँग्रेसचे नगरसेवक जय ठाकूर यांची सर्वसंमतीने निवड करण्यात आली आहे. महापालिकेत एकूण ९५ नगरसेवक असून, त्यापैकी ७८ नगरसेवक भाजपचे आहेत. विरोधात १३ काँग्रेस, ३ शिवसेना आणि १ अपक्ष असे एकूण १७ नगरसेवक आहेत (ज्यापैकी १६ जण या आघाडीत सामील आहेत). नियमानुसार, सत्ताधारी पक्षांनंतर ज्या गटाकडे सर्वाधिक संख्याबळ असते, त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिले जाते. या नव्या युतीमुळे आता विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग सुकर झाला आहे.

या राजकीय भूकंपावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाष्य करताना स्पष्ट केले की, शहराच्या विकासासाठी आणि प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करण्यासाठी काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी ही आघाडी केली आहे. या घडामोडीमुळे केवळ विरोधी पक्षनेतेपदच नव्हे, तर स्थायी समितीमधील सदस्यत्व आणि स्वीकृत नगरसेवक निवडीचा मार्गही मोकळा झाला आहे. यामुळे आगामी काळात महापालिकेच्या कामकाजात भाजपच्या एकहाती सत्तेला चाप बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने या युतीवर सडकून टीका केली आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना आणि काँग्रेसमध्ये छुपी युती असल्याचा आरोप वारंवार केला होता. “आमचे आरोप आज खरे ठरले आहेत,” असे म्हणत भाजप नेत्यांनी विरोधकांच्या या भूमिकेला ‘दुटप्पीपणा’ संबोधले आहे. जनतेने भाजपला कौल दिला असताना, सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या या विसंगत आघाडीला जनता स्वीकारणार नाही, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, राज्याच्या राजकारणात शिवसेना आणि भाजप एकत्र सत्तेत असताना मिरा-भाईंदरमध्ये मात्र संघर्ष टोकाला पोहोचला आहे. एकीकडे ही नवी आघाडी भाजपला विरोध करत आहे, तर दुसरीकडे मराठी एकीकरण समितीने मराठी महापौर करण्याच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. यामुळे येणाऱ्या काळात महापालिकेतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते, ‘शहर विकास आघाडी’मुळे सभागृहात भाजपच्या धोरणांना संघटित आणि आक्रमक विरोधाचा सामना करावा लागेल.


Protected Content

Play sound