Home राजकीय आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! रावेर लोकसभा क्षेत्रात विधानसभा निहाय आढावा बैठकांचे आयोजन

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज! रावेर लोकसभा क्षेत्रात विधानसभा निहाय आढावा बैठकांचे आयोजन


सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटन मजबूत करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून रावेर लोकसभा क्षेत्रात २५ आणि २६ ऑक्टोबर २०२५ रोजी विधानसभा निहाय आढावा बैठकींचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकींना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व जळगाव जिल्हा प्रभारी आरीझ बेग मिर्झा यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन लाभणार आहे.

या बैठकींमध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक तयारी, समन्वय, स्थानिक नेतृत्वाची सक्रियता, तसेच आगामी निवडणुकांसाठी पक्षाच्या रणनितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. आगामी निवडणुकीत काँग्रेसने स्थानिक पातळीवर सज्ज राहावे, यासाठी या बैठकांना विशेष महत्त्व आहे.

बैठकांदरम्यान पक्षाच्या संघटनात्मक रचनेत असलेल्या त्रुटींचा शोध घेऊन त्या दूर करण्यावरही भर देण्यात येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांची ताकद वाढवणे आणि जनतेपर्यंत काँग्रेसची धोरणे पोहोचवण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

या सर्व बैठकींना जिल्हा प्रभारी आरीझ बेग मिर्झा यांच्यासह विविध विधानसभांचे प्रभारी उपस्थित राहणार आहेत. त्यात रावेर विधानसभा प्रभारी डॉ. अरविंद कोलते, चोपडा विधानसभा प्रभारी संजय उमरकर, भुसावळ विधानसभा प्रभारी रामविजय बुरूंगले, तसेच मुक्ताईनगर विधानसभा प्रभारी तुळशीराम नाईक यांचा समावेश आहे. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संघटनातील प्रमुख नेतेही या बैठकींना उपस्थित राहणार आहेत.

जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी सर्व काँग्रेस पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांना या आढावा बैठकीत सक्रीय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “संघटनशक्तीच हे आपल्या विजयाचे खरं बल आहे. स्थानिक स्तरावरची सज्जता आणि समन्वय यावरच आगामी निवडणुकांतील यश अवलंबून आहे.”

असा आहे दौरा

शनिवार २५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत यावल तालुका (रावेर-यावल विधानसभा क्षेत्र) ची बैठक धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर शहर येथे पार पडेल. यावेळी समन्वयक शेखर पाटील, विधानसभा प्रभारी अरविंद कोलते, प्रमुख अतिथी म्हणून आरीज बेग मिर्झा यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोपडा विधानसभेची बैठक चोपडा शहरातील कस्तुरबा विद्यालयात होणार असून यावेळी समन्वयक म्हणून संजय सोनवणे, विधान सभा प्रभारी संजय उमरकर तर प्रमुख अतिथी म्हणून आरीज बेग मिर्झा असणार आहेत. रावेर तालुका (रावेर-यावल विधानसभा क्षेत्र)ची बैठक कृ.उ.बा. समिती, रावेर येथे दुपारी ३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला समन्वयक म्हणून डॉ. राजेंद्र पाटील, विधान सभा प्रभारी संजय उमरकर यांची उपस्थती असणार आहे.

रविवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत भुसावळ विधानसभेची बैठक वांजोळा रोड बालाजी लॉन्स येथे घेण्यात येईल. या बैठकीला समन्वयक शैलेश बोथडे, विधान सभा प्रभारी रामविजय बुरूगंले तर प्रमुख अतिथी म्हणून आरीज बेग मिर्झा हे उपस्थतीत असतील. दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत मुक्ताईनगर विधानसभेची आढावा बैठक शहरातील डॉ. जगदीश पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल येथे होणार असून बैठकीला समन्वयक दिनेश पाटील, विधान सभाक्षेत्र प्रमुख तुळशीराम नाईक व प्रमुख अतिथी आरीज बेग मिर्झा यांची उपस्थिती असणार आहे. तसेच दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत जामनेर विधानसभेची बैठक जामनेर शेतकरी सह. जिनिंग येथे समन्वयक एस.टी.पाटील, विधान सभाक्षेत्र प्रमुख आरीज बेग मिर्झा यांची उपस्थिती असणार आहे.


Protected Content

Play sound