गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीनेच अध्यक्ष होण्यावर राहुल ठाम

rahul gandhi 1 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) २५ मे या दिवशी झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत राहुल यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल काही काळ काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यास तयार आहेत, मात्र आपण कायमस्वरुपी अध्यक्ष राहायचे नाही या मतावर ते ठाम आहेत. पक्षाचे नेतृत्व गांधी घराण्याबाहेरील व्यक्तीनेच करावे यावर ते आजही ठाम असल्याचे बोलले जात आहे. राहुल यांनी नवे नेतृत्व शोधण्यासाठी पक्षाला वेळ दिला असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

 

राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडू नये असाच पक्षातील नेत्यांचा प्रयत्न आहे. केवळ काँग्रेसच नव्हे, तर मित्र पक्ष आरजेडीचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनीही राहुल हेच अध्यक्ष राहावेत असे मत व्यक्त केले आहे. राहुल अध्यक्षपदी राहिले नाहीत तर, आरएसएसविरोधात लढणाऱ्या सर्व सामाजिक आणि राजकीय शक्तींचे मोठे नुकसान होईल असे लालूंचे म्हणणे आहे. डीएमके प्रमुख एम. के. स्टालिन यांनीही राहुल यांनी राजीनामा देऊ नये असे म्हटले आहे.

राजीनाम्याचा प्रस्ताव सादर केलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर कमालीचे नाराज असून त्यांनी काल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना भेटण्याचे ठामपणे नाकारले. राहुल भेटत नाहीत हे स्पष्ट झाल्यानंतर गेहलोत आणि पायलट यांनी प्रियांका गांधी यांचीच भेट घेऊन परतावे लागले. या बरोबरच राहुल यांनी काहीशी नरमाईची भूमिका घेत काही अटींवर पक्षाचे नेतृत्व करण्यास राजी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले असले तरी देखील गांधी घराण्याबाहेरचाच नेता काँग्रेसचा अध्यक्ष असावा, या मतावर ते ठाम असल्याचे सूत्रांनी माहिती देताना सांगितले.

Add Comment

Protected Content