मुंबई (वृत्तसंस्था) औरंगाबादच्या सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी अखेर आज शिवसेनेत प्रवेश केला. दुपारी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. गेल्या काही दिवसांपासून सत्तार भाजपात जाणार असल्याची चर्चा होती. मात्र ऐनवेळी त्यांनी शिवबंधन बांधले.
अब्दुल सत्तार यांनी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून तिकीट नाकारल्यानंतर बंड पुकारला होता. यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा देखील केली. परंतु, इतर पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर त्यांनी ऐनवेळी आपली उमेदवारी मागे घेतली. यानंतर त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अब्दुल सत्तार हे भाजपमध्ये जाणार अशी काही दिवसांपासून चर्चा होती, मात्र सत्तार यांना भाजपमधून मोठा विरोध होता. यामुळे सत्तार यांना आगामी विधानसभा कठीण गेली असती. त्यामुळे सत्तार यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेण्याचे ठरवले. दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय अचानक घेतलेला नाही. त्यांनी विचार करून हा निर्णय घेतला असून, शिवसैनिक म्हणून ते मराठवाड्यात काम करणार आहेत”, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.