नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राज्यातला सरकारस्थापनेसह मुख्यमंत्रीपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. या पार्श्वभूमीवर तिकडे दिल्लीत वेगळ्याच घडामोडी घडत असल्याचे समोर आले आहे. आज सकाळी अचानक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
शिवसेना, भाजप या दोन्ही पक्षांना मिळून बहुमत असूनही सरकारस्थापनेचा दावा भाजपने केलेल नाही. मुख्यमंत्रीपदावरून दोहोंमध्ये एकमत होताना दिसत नाही. गडकरी यांच्या निवासस्थानी झालेली ही भेट सुमारे तासभर चालली. बाहेर येताच अहमद पटेल यांच्यावर प्रसारमाध्यमांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र ‘आपण देशातल्या शेतीच्या प्रश्नावर गडकरी यांना भेटलो. महाराष्ट्राच्या राजकारणावर या बैठकीत काहीही चर्चा झालेली नाही,’ असे ते म्हणाले. नितीन गडकरी हे केंद्रीय परिवहन मंत्री असताना पटेल यांनी शेतीच्या प्रश्नावर काय चर्चा केली हा प्रश्न गुलदस्तातच आहे.