काँग्रेसचा हात देशद्रोहींच्या मागे : पंतप्रधान मोदी

modi in ap

इटानगर (वृत्तसंस्था) सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचे आश्वासन देणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. देशातील फुटिरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणाऱ्या, जय हिंदऐवजी भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते. त्यामुळेच काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्न विचारावासा वाटतो, असे मोदींनी म्हटले आहे. यावेळी त्यांना महाआघाडीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. ते अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या एका जनसभेत बोलत होते.

 

काँग्रेसचे घोषणापत्र हे ‘ढकोसलापत्र’ असल्याची टीका त्यांनी केली. एकीकडे निश्चयी सरकार आहे तर दुसरीकडे खोटी आश्वासने देणारे नामदार आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात सर्व फसवी आश्वासने आहेत. त्यांना जाहीरनामा नव्हे तर ‘ढकोसलापत्र’ म्हटले पाहिजे, असे ते म्हणाले. ही निवडणूक संकल्प आणि कट, भ्रष्टाचार आणि विश्वास यांच्यातील निवडणूक आहे. दरम्यान, काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेतलं देशद्रोहाचं कलम (124-अ) रद्द करण्याचे वचन काँग्रेसने जाहीरनाम्यातून दिले. त्यावरुन मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. ‘आम्ही देशद्रोह्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका मांडतो. मात्र काँग्रेसला हे कलमच रद्द करायचे आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात नेमका कोणासोबत आहे? देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?’, असा सवाल मोदींनी विचारला आहे.

Add Comment

Protected Content