मुंबई-वृत्तसेवा । भिवंडी-निजामपूर महापालिकेच्या महापौरपदी अखेर भाजपचे बंडखोर नगरसेवक नारायण चौधरी यांची निवड झाली आहे. आज झालेल्या निवडणुकीत चौधरी यांनी स्पष्ट बहुमत मिळवत विजय संपादन केला. त्यांच्या या विजयानंतर भिवंडीच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. काँग्रेसने या माध्यमातून चंद्रपूर महापालिकेतील पराभवाचा बदला घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महापौर निवडणुकीत दुपारी स्व. विलासराव देशमुख सभागृहात मतदान प्रक्रिया पार पडली. हात वर करून झालेल्या मतदानात नारायण चौधरी यांना तब्बल 48 मते मिळाली. त्यात काँग्रेसच्या 30 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 12 नगरसेवकांचा समावेश होता. भाजपच्या अधिकृत उमेदवार स्नेहा पाटील यांना केवळ 16 मतांवर समाधान मानावे लागले, तर शिवसेना (शिंदे गट) समर्थित विलास पाटील यांना 25 मते मिळाली.

या नि वडणुकीत एकूण 10 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. सर्व अर्ज वैध ठरल्यानंतर 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला. त्यानंतर 6 उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे स्नेहा पाटील, नारायण चौधरी आणि विलास पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. विशेष म्हणजे शिंदे गटाचे उमेदवार विलास पाटील न्यायालयीन कोठडीत असल्यामुळे सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला.
दरम्यान, उपमहापौरपदासाठीही तिरंगी लढत झाली. त्यात काँग्रेसचे तारिक मोमीन यांनी 43 मते मिळवत विजय मिळवला. शिवसेना (शिंदे गट) चे जावेद दळवी यांना 25 मते, तर भाजपचे सुहास नकाते यांना 21 मते मिळाली. त्यामुळे महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली.
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात भाजपच्या उमेदवारीवरून झाली होती. भाजपने सुरुवातीला नारायण चौधरी यांना महापौरपदाची उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे चौधरी नाराज झाले. त्यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सेक्युलर फ्रंटला पाठिंबा दिला. काँग्रेसने त्यांना अधिकृत पाठिंबा देत व्हीप जारी केला आणि त्याचा थेट फायदा चौधरी यांना झाला.
काँग्रेसने या विजयाच्या माध्यमातून भिवंडी महापालिकेतील सत्ता आपल्या बाजूला खेचली आहे. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेत भाजपने केलेल्या राजकीय डावपेचांचा बदला काँग्रेसने घेतल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नारायण चौधरी आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पक्षाचा व्हीप मोडणाऱ्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. भाजप आमदार महेश चौगुले यांनीही बंडखोरांविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत.
नारायण चौधरी यांचा राजकीय प्रवासही विशेष उल्लेखनीय आहे. दूध व्यवसायातून सुरुवात करून त्यांनी बांधकाम व्यवसायात प्रवेश केला आणि त्याचबरोबर राजकारणातही सक्रिय झाले. 2002 मध्ये ते प्रथम नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर अपक्ष, समाजवादी पक्ष, शिवसेना आणि अखेर भाजप असा त्यांचा प्रवास झाला. मात्र महापौरपदाची उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी सेक्युलर फ्रंटच्या माध्यमातून निवडणूक लढवत अखेर महापौरपद पटकावले.
या निकालामुळे भिवंडीच्या राजकारणात नवीन समीकरणे तयार झाली असून आगामी काळात भाजप या प्रकरणी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



