नवी दिल्ली (वृत्तसंस्था) काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धार वाढवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादृष्टीनं आज पक्षानं ‘अब होगा न्याय’ या घोषणेचं प्रचार गाणं लाँच केलं आहे. निवडणूक जाहीरनाम्यातील ‘न्याय’ या योजनेंतर्गत जाहीर केलेल्या ‘किमान उत्पन्न हमी’च्या घोषणेवर आधारित हे गाणं आहे.
काँग्रेसनं या प्रचार गाण्यात शेतकरी, गरीब आणि युवकांचा उल्लेख केला आहे. तसंच शेतकरी समस्या, बेरोजगारीचं प्रमाण, नोटाबंदी, महिला सुरक्षा, जीएसटी आणि इतर बाबींकडे या गाण्यातून लक्ष वेधण्यात आलं आहे. ‘न्याय’ हे काँग्रेसच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी असेल, असं काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सांगितलं. न्याय या शब्दातून केवळ जाहीरनाम्यातील ‘किमान उत्पन्न हमी’च नव्हे तर, समाजातील सर्व घटकांना न्याय देण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं. देशभरात ठिकठिकाणी कंटेनर ट्रकवर स्क्रीन लावून हा व्हिडिओ दाखवण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
दरम्यान, गाणं लाँच करण्यापूर्वी त्यातील काही ओळींवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यातील काही ओळींमध्ये बदल करण्यात यावा, असं निवडणूक आयोगानं काँग्रेसला सांगितलं होतं. या ओळींमुळं जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असं कारण दिलं होतं. दरम्यान, गाणं लाँच करण्यापूर्वी त्यात बदल करण्यात आले आहेत, असं सूत्रांनी म्हटले आहे.