फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फैजपूर शहराच्या राजकारणात खळबळ उडवणारा प्रकार समोर आला असून काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या चार नगरसेवक व नगरसेविकांना अपात्र ठरविण्याची मागणी फैजपूर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. पक्षशिस्त मोडून आर्थिक देवाणघेवाण व भाजपाशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप शहराध्यक्ष शेख रियाज यांनी केला आहे.

फैजपूर नगरपालिकेत काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले चार सदस्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. प्रभाग क्रमांक 1 मधून हकीम अहमद तडवी (एसटी), प्रभाग क्रमांक 2 मधून सादेका शेख दानिश (सर्वसाधारण महिला), प्रभाग क्रमांक 7 मधून प्रियंका ईश्वर इंगळे आणि प्रभाग क्रमांक 8 मधून इरफान शेख इक्बाल (सर्वसाधारण पुरुष) हे चार नगरसेवक-नगरसेविका काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडून आले होते.

मात्र 9 जानेवारी 2026 रोजी माजी आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या बंगल्यावर स्वीकृत सदस्य उमेदवारीसंदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसचे चार नगरसेवक तसेच शरद पवार गटाचे नगरसेवक अन्वर अजगर खाटीक उपस्थित होते. या बैठकीत एकमताने ठराव करून स्वीकृत सदस्य पदासाठी पक्षाच्या अधिकृत भूमिकेप्रमाणे निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा काँग्रेस शहर कमिटीने केला आहे.
असे असतानाही काँग्रेस गटनेते इरफान शेख इक्बाल यांनी या ठरावाला न जुमानता स्वतंत्रपणे निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाण करत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांचे पती पवन अनिल सराफ यांच्यासोबत संगनमत करून स्वीकृत सदस्य पदाचा प्रस्ताव पाठविण्यात आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. हा प्रकार केवळ पक्षशिस्तभंग नसून मुस्लिम समाज आणि काँग्रेस पक्षाशी केलेली उघड गद्दारी असल्याचा आरोप शहराध्यक्ष शेख रियाज यांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित चारही नगरसेवक-नगरसेविकांवर कठोर कारवाई करावी, त्यांना नियमानुसार अपात्रतेची नोटीस बजावावी तसेच फैजपूर नगरपालिकेतील काँग्रेस गट रद्द करण्यात यावा, अशी ठाम मागणी फैजपूर शहर काँग्रेस कमिटी व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या मागणीसंदर्भातील निवेदनाच्या प्रती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच एनएसयुआयचे नेते धनंजय चौधरी यांना माहितीसाठी पाठविण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



