Home राजकीय काँग्रेसची मुंबई मनपा स्वतंत्र लढण्याची घोषणा

काँग्रेसची मुंबई मनपा स्वतंत्र लढण्याची घोषणा

0
123

मुंबई ,लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा ।  बिहार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये आत्मपरीक्षण सुरू झाले असून त्याचे धक्के थेट महाराष्ट्रात जाणवू लागले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीत स्वबळावर उतरायचा निर्णय जाहीर करून महाविकास आघाडीला पहिला मोठा धक्का दिला आहे. बिहार निवडणुकीचा हा साईड इफेक्ट तर नाही ना, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मुंबईत आयोजित एकदिवसीय शिबिरात काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. त्यांनी काँग्रेस मुंबई महापालिका निवडणुकीत एकटी लढणार असल्याचे सांगितले. स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची इच्छा आणि स्थानिक नेतृत्वाचे मत लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी नमूद केले. महाविकास आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय अचानक नसून कार्यकर्त्यांच्या मागणीवर घेतलेला असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी बिहार निवडणुकीत निवडणूक आयोगाने भाजपला मदत केल्याचा आरोप करताच त्यावरून झालेल्या चर्चेला चांगलीच किनार मिळाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणामुळेच काँग्रेस दूर राहत आहे का, असा प्रश्न विचारला असता चेन्नीथला यांनी हे सुतोवाच पूर्णतः फेटाळले. दोन ठाकरे एकत्र आले म्हणून आम्ही निर्णय घेतला नाही, तर कार्यकर्त्यांची इच्छा आणि संघटनात्मक गरजा महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले.

मुंबई महापालिकेच्या 227 जागांवर काँग्रेस स्वबळावर लढणार असून कार्यकर्त्यांनी सुचविलेल्या मार्गानेच जाणार असल्याचे चेन्नीथला यांनी सांगितले. स्थानिक पातळीवर कुठलीही नाराजी नसून सर्व पदाधिकारी एकदिलाने लढण्यासाठी सज्ज असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, मुंबईतील हा स्वतंत्र रस्ता फक्त महापालिकेपुरता मर्यादित राहणार की राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही अशीच भूमिका घेतली जाणार, यावर आगामी आघाडी राजकारणाची दिशा मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे.


Protected Content

Play sound