जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव (ग्रामीण) तालुका काँग्रेस कमिटीने जिल्ह्यातील सौर कृषी पंप योजनेतील अनियमितता आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारींवरून प्रशासनाचे लक्ष वेधत जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन सादर केले. या निवेदनातून महाऊर्जा विभाग आणि संबंधित ठेकेदारांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा संताप व्यक्त करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारकडून सौर कृषी पंप योजना राबवण्यात येत आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात ही योजना अपेक्षित पद्धतीने राबवली जात नसून, महाऊर्जा अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अनेक शेतकऱ्यांनी लेखी तक्रारी तसेच व्हिडिओद्वारे आपली समस्या मांडल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सौर पंप मंजुरीसाठी होणाऱ्या सर्वेक्षणाच्या टप्प्यातच आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप आहेत. जे शेतकरी पैसे देऊ शकत नाहीत, त्यांची नावे योजनेत समाविष्ट केली जात नाहीत, अशी गंभीर बाब समोर आली आहे. तसेच मंजुरीनंतर पुरवण्यात येणारे साहित्य हे विविध कंपन्यांचे एकत्रित स्वरूपात दिले जात असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. त्यामुळे पाच वर्षांच्या मोफत सेवेसंदर्भात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्यानंतर महाऊर्जा अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित कंपनीशी संपर्क साधण्यास सांगितले जाते, मात्र कंपनीकडून प्रतिसाद मिळत नाही. प्रत्येक जिल्ह्यात सर्विस सेंटर असणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात ती सुविधा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी पिकांचे नुकसान होऊन अनेक शेतकरी कर्जबाजारी होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
या संदर्भात तालुका काँग्रेस अध्यक्ष मनोज दिगंबर चौधरी यांनी माहितीच्या अधिकाराखाली महाऊर्जा विभागाकडे सौर पंपांच्या स्थापनेबाबत आणि सेवा केंद्रांबाबत माहिती मागवली होती. मात्र मिळालेली माहिती अपूर्ण आणि दिशाभूल करणारी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेस कमिटीने प्रशासनाला इशारा देत सांगितले की, सौर कृषी पंप योजनेतील समस्या तातडीने सोडवण्यात आल्या नाहीत आणि शेतकऱ्यांना योग्य सेवा उपलब्ध झाली नाही, तर महाऊर्जा कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन तालुकाध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली विशाल सपकाळे, रवींद्र सोनवणे, गणेश भालेराव, प्रदिप घोलप, मिलींद भालेराव, महिला तालुकाध्यक्ष प्रतिभा सोनवणे, संगीता मोरे, अर्चना गाडे, नितीन चौधरी, समाधान कोळी, राजू शेवाळे आदींची स्वाक्षरीने देण्यात आले.



