भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ येथे आयोजित केलेली भुसावळ रन स्पर्धा व जळगाव येथे संपन्न झालेली खान्देश रन यामध्ये भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे अनुक्रमे ७५ व ६५ धावपटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या दोनही स्पर्धेत काही धावपटू विजयी देखील झाले होते. त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी कृष्णचंद्र सभागृहाशेजारील मैदानावर असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आला होता. आपल्याच सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या या सत्कारामुळे विजयी धावपटू अधिक आनंदले.
भुसावळ रन स्पर्धेत १० किमी गटात पुरुषांच्या स्पर्धेत संजय भदाणे प्रथम, डॉ तुषार पाटील द्वितीय, मुकेश चौधरी तृतीय तर निलेश पाटील चौथ्या स्थानावर विजयी ठरले होते. या विजयी स्पर्धकांचा सत्कार असोसिएशनचे प्रमुख प्रा. प्रविण फालक यांच्या उपस्थितीत प्रवीण वारके, प्रमोद शुक्ला व रमेश पाटील यांनी केला. त्यांनतर याच रनमध्ये महिलांच्या गटात १० किमीमध्ये सीमा पाटील प्रथम , रीना परदेशी द्वितीय तर स्वाती फालक तृतीय स्थानावर विजयी ठरल्या होत्या. या विजयी महिला धावपटूंचा सत्कार असोसिएशनतर्फे डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांनी केला. याशिवाय स्वाती फालक या खान्देश रनमध्ये २१ किमीमध्ये देखील तृतीय स्थानी विजयी होत्या त्यामुळे त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी सर्व उपस्थित धावपटूंनी मोठा जल्लोष केला. शिवाय उमेश घुले यांनी २१ किमी अंतर केवळ १ तास ४३ मिनिटात पूर्ण केल्यामुळे त्यांना देखील गौरविण्यात आले. याशिवाय सुषमा भारती सिंग, पिंकी सिंग, गरिमा न्याती, पुष्पा तिवारी, लिपिका राऊत, गुंजन गुप्ता, सीमा वायकर, प्रीती पांडा,शीला कश्यप, जयश्री तिकोडकर या महिला धावपटू प्रथमच शहराबाहेरील खान्देश रनमध्ये १० किमी गटात यशस्वी झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार असोसिएशनतर्फे करण्यात आला.
जळगाव येथील खान्देश रनचे हे सलग आठवे वर्ष होते. आठही वेळा या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सारंग चौधरी, डॉ नीलिमा नेहेते, प्रवीण वारके, प्रविण पाटील यांना विशेषतः गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण पाटील यांनी तर यशस्वीतेसाठी डॉ नीलिमा नेहेते व डॉ चारुलता पाटील यांचे सहकार्य लाभले.