जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग नवी दिल्ली व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ऑक्टोबर रोजी विद्यापीठात “स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी नायकांचे योगदान” या विषयावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या एक दिवसीय विद्यार्थी संमेलनात “स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी नायकांचे योगदान” या विषयावर पोस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली असून प्रथम पूरस्कार रु.३३७५/-, व्दितीय रु.२२७५/- व तृतीय पुरस्कार रु.११७५/- देऊन गौरविण्यात येणार आहे. पोस्टर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी १x१ मीटर या आकाराचे फ्लेक्स बॅनर तयार करावयाचे आहे. महाविद्यालयाने पोस्टरची आपल्यास्तरावर छाननी करुन त्यातील निवडक किमान एक किंवा जास्तीत जास्त दोन पोस्टर संमलनात येतांना सोबत आणावी. पोस्टरची सॉफ्ट कॉपी ६ ऑक्टोबर पर्यंत [email protected] या ईमेलवर पाठवावी. या शिवाय संलग्नित महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील किमान दोन विद्यार्थ्यांना संमेलनास पाठवावे असे आवाहन विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.सुनील कुलकर्णी यांनी केले असून महाविद्यालयांना तसे पत्र पाठविण्यात आले आहे.
८ ऑक्टोबर रोजी या अनुसूचित जमाती विद्यार्थी संमेलनाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्याहस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बिरसा मुंडा जनजाती केंद्रीय विद्यापीठाचे (राजपिपला, गुजरात) कुलगुरु प्रा.मधुकर पाडवी हे उपस्थित राहणार आहेत. जनजाती आयोगाचे संयोजक वैभव सुरंगे, आर.एस.मिश्रा, प्रकाश टारपे हे संमेलनात मार्गदर्शन करणार आहेत. उद्घाटनाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी राहतील. हे संमेलन यशस्वी करण्याचे आवाहन प्रा.सुनील कुलकर्णी, संमेलन शैक्षणिक प्रमुख प्रा.अमरदीप पाटील व प्रा.भूषण चौधरी यांनी केले आहे.