यावल (प्रतिनिधी) येथे रविवारी रात्री चालत्या एसटी बसचा दरवाजा उघडून रस्त्यावर पडल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. तेव्हा याप्रकरणी बुधवारी येथील पोलिसात एसटी बस चालक व वाहकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला जवाबदार धरत तसेच कामात निष्काळजीपणा केला म्हणुन बुधवारी त्या बसच्या वाहकाला निलंबित करण्यात आले आहे.
यावल आगारातुन यावल-भुसावळ या बसव्दारे (क्रमांक एम.एच.२०,बी.एल.१६४१) रविवारी रात्री ८.४० वाजता बंटी गुलाबचंद डोलतानी, रा. सिधी कॉलनी, भुसावळ हा भुसावळला जाण्याकरीता शहरातील फालकनगर बस थांबा येथून बसला होता. तेथुन काही अंतरावरच बीएसएनएल कार्यालयाच्या पुढील वळणावर अचानक बसचा दरवाजा उघडून धावत्या बसमधुन थेट रस्त्यावर कोसळल्याने बंटीच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी यावल पोलिसात बुधवारी शेखर पटेल यांनी दिलेल्या फिर्यादी वरून एसटी बसचे चालक संजय वासुदेव खलसे यांनी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत बेदरकारपणे वाहन चालवले, तसेच वाहक जगन्नाथ राजाराम महाजन यांनी बसचा दरवाजा व्यवस्थित बंद न करता बस चालवण्याचा इशारा दिला. त्यामुळे ते दोघे बंटी डोलतानी यांच्या मृत्यूस कारणीभुत ठरले आहेत, म्हणुन विविध कलामांन्वये दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील, हवालदार गोरख पाटील करीत आहेत.
वाहकास केले निलंबीत- बुधवारी परिवहन मंडळाने या दुर्घटनेस जवाबदार धरत तसेच परिवहन विभागाच्या अधिनियमनानुसार कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत वाहक जगन्नाथ राजाराम महाजन यांना निलंबीत केले आहे. या घटनेपुर्वी यावल शहरातील प्रमोद वाणी यांच्यावरही असाचं प्रसंग ओढावला होता. ते जळगावहून यावल येथे येत असतांना किनगाव ते साकळी दरम्यान अचानक चालत्या बसचा दरवाजा उघडून ते बाहेर पडले होते. त्यावेळी ते थोडक्यात बचावले होते.