जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालय व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत उद्या 8 फेब्रुवारी पासून दोन दिवसीय राज्यस्तरीय उष्मा लाट कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होणाऱ्या या कार्यशाळेचे उद्घाटन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील असणार आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
या कार्यशाळेत आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव डॉ.सोनिया सेठी , कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.महेश्वरी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासो धुळाज आदी उपस्थित राहणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी उद्घाटन सत्रानंतर मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रांचे उप महासंचालक सुनिल कांबळे यांचे ‘उष्णतेच्या लाटे संदर्भातील – व्याख्या, परिभाष, पूर्व सुचना निकष, पुर्व सूचना प्रणाली आणि २०२४ साठीचे पुर्वानुमान ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. युनिसेफचे प्रकल्प अधिकारी अनिल घोडके यांचे ‘मध्य भारतामध्ये क्लामेट स्मार्ट इन्स्टिट्यूशन चा वापर करून उष्मा लाटेचे सौम्यीकरण आणि अत्यावश्यक सेवा या विषयावर ‘ व्याख्यान होणार आहे. राज्य हवामान कृती कक्ष आणि पर्यावरण व वातावरीणीय बदलाचे संचालक अभिजित घोरपडे यांचे ‘राज्य हवामान कृती आराखडा आणि विभाागाच्या इतर योजना ‘या विषयावर व्याख्यान होणार आहे. ८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सत्रात गांधीनगरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक डॉ.महावीर गोलेच्छा यांचे ‘उष्णता लाटेच्या कृती आराखडा तयार करणे तसेच संबंधित विभागाने घ्यावयाच्या प्रमुख कृती’ याविषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या डॉ.योगश्री सोनवणे यांचे ‘उष्णतेच्या लाटेच्या कृतीसाठी तयारी, आव्हाने आणि पुढील मार्ग- सार्वजनिक आरोग्य विभाग’या विषयावर व्याख्यान होणार आहे.
९ फेब्रुवारी रोजी उष्णतेची लाट आणि शेती या विषयावर कृषी विभागाचे सेवानिवृत्त प्रकल्प अधिकारी अनिल भोकरे यांचे व्याख्यान होणार आहे. नागपूरचे सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नंदकिशोर राठी यांचे ‘उष्णतेच्या लाटेचा कृती आराखडा आणि त्याची अंमलबजावणी’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक आप्पासो धुळाज यांचे ‘राज्य उष्णतेच्या लाटेचा कृती आराखड्यातील आढावा आणि पुढील वाटचाल’ याविषयावर व्याख्यान होणार आहे. समारोप कार्यक्रमात आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील उपस्थित राहणार आहेत.
या कार्यशाळेला राज्यातील सर्व निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महानगरपालिका-नगरपालिकेचे अधिकारी, कृषी , आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.