यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) लसीकरण मोहिमेबाबत सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत असल्याची बाब समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने योग्य माहिती देणारी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (अप)च्या वतीने यावल येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावल नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अप)च्या गटनेत्या वर्षा चोपडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात एचपीव्ही लसीकरणाबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या अफवा पसरत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही माध्यमांतून अमेरिकेकडून या लसीबाबत धोका असल्याचे भ्रामक संदेश प्रसारित होत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने अधिकृत माहिती आणि मार्गदर्शन नागरिकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या संदर्भात दिलेल्या माहितीनुसार, 2022 सालच्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 34 हजार 805 महिलांचा मृत्यू गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे झाला आहे. ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस हा एक प्रकारचा विषाणू असून त्याच्या संसर्गामुळे महिलांमध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा एकमेव असा कर्करोग आहे, जो योग्य वेळी लसीकरण केल्यास टाळता येऊ शकतो.
तथापि, सध्या सोशल मीडियावर या लसीबाबत चुकीची माहिती मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या लसीमुळे वंधत्व, गर्भपात किंवा जन्मदोष होऊ शकतात, अशा प्रकारचे दावे करण्यात येत असून त्यामुळे अनेक पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः मुलींच्या आरोग्याशी संबंधित हा अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अप)च्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या संदर्भात तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांच्याकडे कार्यकर्त्यांनी निवेदन देत याबाबत ठोस माहिती प्रसारित करण्याची मागणी केली. त्यावर तहसीलदारांनी तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधीक्षकांना तातडीने जनजागृती मोहीम राबवून नागरिकांना योग्य माहिती देण्याचे निर्देश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अप)च्या गटनेत्या वर्षा चोपडे, युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष आकाश चोपडे, युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील, शहराध्यक्ष योगेश पाटील, प्रेम देवरे, गोलू महाजन, किरण महाजन, रोहित महाजन, जुनेद खान, अल्तमस शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



